देहरादून : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनामुळे बहुतांश मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मिळेल त्या वाहनांतून मूळगावी जाण्यासाठी अनेकांकडून पसंती दिली जात आहेत. त्यामुळे अपघात घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अद्यापही अनेक मजुरांना मूळगावी जाता आलेले नाही, त्यामुळे त्याचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. कोरोनाच्या संकटात मध्य प्रदेशातील प्रवासी आपल्या गावी येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यापैकी अनेकजण कित्येक दिवसांपासून पायी प्रवास करीत आहेत. अनेकजण तर अद्यापही ट्रकमध्ये लपून-छपून प्रवास करीत आहेत. पुण्यातून 33 मजूरांनी लपूछपून प्रवास केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी हरिद्वार जनपदकडून येणारा ट्रक चेकपोस्टवर पकडला असता त्यामध्ये 33 प्रवासी मजुर बसले होते. यांच्याकडे राज्यात येण्याची परवानगी नव्हती. दुसरीकडे जेव्हा पोलिसांनी ड्रायव्हरकडे चौकशी करायचा प्रयत्न केला तेव्हा तो फरार झाला. पोलिसांनी प्रवासी मजुरांची चौकशी केली तेव्हा ते सर्व प्रवासी पुण्याहून आल्याचे निष्पन्न झाले. हे सर्वजण पुण्यातील विविध भागांमध्ये काम करीत होते. ते मध्य प्रदेशात जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र कोणताही मार्ग नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर या ट्रकमालकाच्या मदतीने त्यांनी लपून प्रवास करण्याची जोखीम उचलली.13 मे रोजी पुण्याहून निघाले होते, मात्र त्यांच्याकडे परवानगी नव्हती. सध्या या 33 जणांना वैद्यकीय परीक्षण केले जात आहे. अशा स्वरुपात आल्याने त्यांनी लॉकडाऊनचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.