कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या वृद्ध रुग्णाला दफन करण्यास अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यानंतर कुटुंबाला मजबुरीने मृतदेह दोन दिवस आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवावा लागला. तर त्या वृद्धाचा चाचणी अहवाल मंगळवारी आला, ज्यामध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली.
मध्यवर्ती कोलकाता येथील राजा राममोहनराय सरानी भागात सोमवारी श्वासोच्छवासाच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या ७१ वर्षीय वृद्धाचा सोमवारी त्यांच्या घरी मृत्यू झाला होता. सोमवारी ज्या डॉक्टरांना ते दाखवायला गेले होते, त्या डॉक्टरांनी त्यांना कोरोना विषाणूची तपासणी करण्यास सांगितले होते आणि त्यांनी तपासणीही केली.
कुटुंबातील सदस्याने सांगितले की, पण घरी परतल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. दुपारी त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर पीपीई किट घालून त्या व्यक्तीच्या घरी गेले. पण त्यांनी हे सांगत डेथ सर्टिफिकेट जारी केले नाही की, हे कोविड-१९ प्रकरण आहे. डॉक्टरांनी कुटुंबीयांना अमहर्स्ट स्ट्रीट पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
स्मशानभूमीतून देखील मिळाली नाही मदत
पोलिसांनी कुटुंबीयांना स्थानिक नगरसेवकाशी संपर्क साधण्यास सांगितले. कुटुंबातील सदस्याने सांगितले की, ‘आम्हाला तेथेही कोणती मदत मिळाली नाही आणि आम्हाला राज्य आरोग्य विभागाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले.’ कुटुंबातील आणखी एका सदस्याने सांगितले की, आम्ही हेल्पलाईन क्रमांकावर आरोग्य विभागाला फोनही केला, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी बर्याच स्मशानभूमींशी संपर्क साधला, पण तेथूनही मदत मिळाली नाही.
त्यानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार होईपर्यंत मृतदेह ठेवण्यासाठी आईस्क्रीम फ्रीजरची व्यवस्था केली. वृद्धांचा चाचणी अहवाल मंगळवारी आला, ज्यात कोविड-१९ ची पुष्टी झाली. बुधवारी कुटुंबीयांना आरोग्य विभागाचा फोन आला, तेव्हा त्यांनी संपूर्ण गोष्ट सांगितली. त्यानंतर कोलकाता महानगरपालिकेचे लोक आले आणि ते मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले.