नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्लिकेशन्सवर बंदी घातली. या बंदीमुळे चीनला आर्थिक फटणार बसणार की नाही याबाबत बरीच चर्चा सुरू असताना, आता चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या बंदीमुळे टिकटॉकची मालकी असलेल्या बाईट डान्स कंपनीला मोठे नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे.
संघर्षानंतर भारत सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्स बॅन केले आहेत. यामुळे टिकटॉकची मदर कंपनी असलेल्या बाईट डान्सला 6 बिलियन डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. टिकटॉकसह 58 चिनी अॅपवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाची अमेरिकेतही दखल घेण्यात आली आहे. काही अमेरिकी खासदारांनी अमेरिकन सरकारला भारतासारखाच निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
हे चिनी शॉर्ट व्हिडीओ शेअरींग अॅप राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे या सदस्यांचे मत आहे. काँग्रेसमधील रिपब्लिकन सदस्य रिक क्रॉफर्ड यांनी टिकटॉक बंद झाले पाहिजे असे म्हटले आहे. मागच्या आठवडयात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी चीन सरकार आपल्या फायद्यासाठी टिकटॉकचा वापर करते असा आरोप केला होता. अमेरिकेत जवळपास टिकटॉकचे 4 कोटी वापरकर्ते आहेत.