औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – टिकटॉक स्टार पूजा पवार या 22 वर्षीय तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर भाजपने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याप्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचे नाव समोर आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचलक यांना पत्र पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करुन 12 ऑडिओ क्लिप पाठवल्या आहेत. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. तर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे थेट नाव घेऊन त्यांच्या मुसक्या आवळा अशी मागणी केली आहे.
या अनुषंगाने रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आले असता, या प्रकरणातलं सत्य समोर यायला हवं, असे दानवे म्हणाले. पूजा चव्हाण प्रकरणात कुणी दोषी असेल तर त्याला माफ केले जाऊ नये. त्याला पाठिशी घालण्याचा प्रयत्न कुणी करु नये, ही भाजपची स्पष्ट भूमिका असल्याचे नमूद करतानाच ज्या ज्या पक्षांनी महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या मुद्यावर रस्त्यावर उतरुन आंदोलने केलीत त्यांनी आताही या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे, असे दानवे यांनी म्हटले आहे.