बहुजननामा ऑनलाइन टीम – जर तुम्हाला मुलांसाठी किंवा त्यांच्या भविष्यासाठी काही गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund – PPF) मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. शासनाकडून चालवली जाणारी ही एक छोटी बचत योजना आहे. हा फंड 15 वर्षात परिपक्व (Mature) होतो.
सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही योजना EEE प्रकारात मोडते. योजनेत केलेल्या संपूर्ण गुंतवणुकीवरही कर सवलतीचा लाभ मिळतो. याव्यतिरीक्त व्याज आणि परिपक्वतापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर सवलत देण्याचे देखील फायदे आहेत.
जर तुम्ही मुलांच्या नावावर त्यांच्या 10 व्या वर्षापासून पीपीएफमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर मुलं 25 वर्षांची होईपर्यंत पीपीएफसुद्धा मॅच्युअर होतो. या योजनेअंतर्गत महिन्याला केवळ 1000 रुपये गुंतवून तुम्ही 15 वर्षात सुमारे 3.20 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. म्हणजेच तुम्ही 15 वर्षात 1 लाख 80 हजारांची गुंतवणूक करून 3 लाख 20 हजार फंड जमा करू शकता. याशिवाय महिन्याला 2000 रुपये गुंतवून तुम्ही 15 वर्षात सुमारे 6.40 लाख रुपयांचा निधी जमा करू शकता.
15 वर्षांनंतर गुंतवणूक सुरू ठेवण्याचं बंधन नाही
15 वर्षांनंतर जर आवश्यकता असेल तर मुलं खात्यातून पैसे काढू शकतात. जर गरज नसेल तर पीपीएफ 5 वर्षांसाठी वाढवू शकतात. पुढील 5 वर्ष यात गुंतवणूक सुरू ठेवणं आवश्यक नाही. अधिक गुंतवणूक न करताही आपल्या ठेवींवर 7.1 टक्के व्याज मिळणं सुरू राहिल. मुलं 30 वर्षांची झाल्यावर ते पैसे काढू शकतात. तेव्हाही त्यांनी पैशांची गरज नसेल तर आणखी 5 वर्षांसाठी ही मुदत वाढवता येते.
166 रुपयांच्या गुंतवणुकीवर 16 लाखांपेक्षा अधिक फायदा
जर तुम्ही पीपीएफमध्ये रोज 166 रुपये किंवा एका महिन्यात 5000 रुपये जमा केले तर 15 वर्षात तुमची गुंतवणूक 16.27 लाख होईल. 15 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 9 लाख तर 7.27 लाख रुपये व्याज मिळेल.
फक्त 500 रुपयात सुरू करा खातं
पीपीएफ खातं उघडण्यासाठी लागणारी किमान रक्कम 500 रुपये आहे. आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा करणं आवश्यक आहे. तर जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा वर्षाकाठी 1.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
कर सवलतीचा लाभ
पीपीएफ हे EEE च्या श्रेणती येतं. म्हणजेच या योजनेंतर्गत तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. तसंच या योजनेतील गुंतवणुकीपासून त्यावर मिळणाऱ्या संपूर्ण व्याजाच्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही. पीपीएफ गुंतवणुकीवरील व्याजदर प्रत्येक 3 महिन्यांनी बदलत असतात.
कर्ज काढण्याचीही सुविधा
तुम्ही पीपीएफ खात्यावर जमा रकमेवर कर्जही घेऊ शकता. तुम्ही पीपीएफ खाते उघडल्याच्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर ते 5 व्या आर्थिक वर्षाच्या समाप्ती पर्यंत पीपीएफ कडून कर्ज घेण्याचे तुम्हाला अधिकार आहेत. जर आपण जानेवारीत 2017 मध्ये पीपीएफ खातं उघडलं असेल तर आपण 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2020 पर्यंत कर्ज घेऊ शकता. ठेवीवर तुम्ही जास्तीत जास्त 25 टक्के कर्ज घेऊ शकता.
पीपीएफ खातं कोणत्याही न्यायालय किंवा आदेशाद्वारे कर्ज किंवा इतर उत्तरदायित्वाच्या वेळी जप्त करणं शक्य नाही. पीपीएफ खातं हे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात स्वत:च्या नावानं किंवा एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या नावानं उघडलं जाऊ शकतं. नियमांनुसार पीपीएफ खातं हिंदू अविभाजित कुटुंबाच्या (HUF) नावे उघडता येत नाही.