बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवताना सहा फुटांचे अंतर ठेवल्यानंतरही लागण होण्याची भीती आहे. कारण खोकल्याने किंवा शिंकल्याने करोनाचे विषाणू जवळपास 20 फुटांपर्यंत जाऊ शकतात असे एका संशोधनात समोर आले आहे. संशोधकांना वेगेवगळ्या वातावरणात खोकणे, शिंकणे, श्वास सोडताना निघणार्या थेंबांचा अभ्यास केला असून एक मॉडेल तयार केले आहे. यानुसार थंड आणि दमट हवामानात करोनाच्या विषाणूंचा फैलाव तीन पट वेगाने होऊ शकतो.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकताना किंवा शिंकताना निघणारे थेंब 20 फुटांपर्यंत प्रवास करत कोरोनाचा फैलाव करु शकतात. यामुळे सध्या सोशल डिस्टन्सिंगमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जावे असे सांगणारा नियम करोनाला ऱोखण्यासाठी पुरेसा नसल्याचे उघड झाले आहे. खोकणे, शिंकणे इतकंच नाही तर सामान्यपणे बोलताना जवळपास 40 हजार थेंब बाहेर पडू शकतात. हे थेंब प्रती सेकंद काही मीटरपासून ते 100 मीटरपर्यंत प्रवास करु शकतात. थेंबांची वायुगती, उष्णता आणि वातावरणासोबत होणार्या बदलांमधील प्रक्रिया विषाणूंचा प्रभाव किती होईल ठरवत आहे. मोठे थेंब गुरुत्वाकर्षणमुळे एखाद्या गोष्टीवर साचून राहतात. पण छोटे थेंब एरोसोल कण तयार कऱण्यासाठी वेगाने बाष्पीभवन करतात. हे कण व्हायरसचा फैलाव करण्यात सक्षम असतात आणि अनेक तास हवेत राहतात. मास्क घातल्याने विषाणूंची लागण होण्याचा धोका कमी होतो असेही संशोधकांनी सांगितले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन विषाणूंची लागण होण्याचा धोका टाळता येऊ शकतो असेही ते म्हणाले आहेत.