कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला कोल्हापुरात गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी अशा जयघोषानी परिसर दुमदुमून गेला होता.
शहरामध्ये उभा मारुती चौकात ऐतिहासिक किल्ल्याची ३० फुटी काल्पनिक कमान उभी केली होती. तर ४५ फुटी स्टेजवरही दोन्ही बाजूंना हत्ती आणि मधोमध शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला होता. यावर विविध रंगांतील एलईडी लाईटचा प्रकाशझोत टाकण्यात आल्यामुळे ही कमान व एकूणच येथील वातावरण उत्साही व लक्षवेधी दिसत होते.
ह्या कमानीचे व स्टेजवरील सजावट बाबासाहेब कांबळे यांनी केली होते. याचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक डॉ. भारत खराटे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवजयंती उत्सवानिमित्त कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळातर्फे गुरुवारी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते.