बहुजननामा ऑनलाईन – मध्यप्रदेशातील अलिराजपूर येथे मंगळवारी (ता.३) एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका मुलीला अटक केली. या मुलीवर दुसर्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. मात्र अपहरण झालेल्या मुलीनेही आम्ही एकमेकांना पंसत करतो आणि एकमेकांशी लग्न करून एकत्र राहण्याची आमची इच्छा असल्याचे पोलीसांना ठामपणे सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघीही पांगोला या एकाच गावी राहणाऱ्या असून दोघीही एकमेकींवर प्रेम करतात. यामुळे या दोनदा घरातून पळून गेल्या होत्या. मात्र त्यातील अपहरण झालेली मुलगी अल्पवयीन असल्यामुळे दुसऱ्या मुलीवर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तिला अटक करुन न्यायालयात हजर करणार आहेत. मुलाच्या पोशाखात राहणारी आरोपी मुलगी रंगूबाईने त्या दोघींना एकत्र राहायचे असल्याचे सांगितले आहे. तर अपहरण झालेल्या मुलीनेही त्या दोघांनाही एकत्र राहायचे आहे आणि रंगूबाई मुलगी असली तरीही माझी निवड आहे. मी फक्त रंगूबाई (आरोपी) बरोबरच लग्न करणार असल्याचे म्हटले आहे.
या मुलींनी एक वर्षापूर्वीच पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण समाजातील लोकांनी त्यांना पकडून आणले होते. भिल्ल पंचायतीत करार होऊन साठ हजार रुपये, शिक्षा म्हणून १७ हजार रुपये आणि एक बकरी देण्यात आली होती. पण 2 महिन्यांपूर्वी या दोघीनी पुन्हा लग्न करण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणातील एसडीओपी जोबट आरसी भाकर म्हणाले की, हे प्रकरण समलैंगिक संबंधांबद्दल असून देशातील सर्वोच्च न्यायलयाने समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता दिली आहे. परंतु यापैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. म्हणूनच पोलिसांनी सज्ञान मुलीवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.