बहुजननामा ऑनलाईन- विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. आता पुन्हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे जवळचे मित्र सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर असून त्यांनी बुधवारी (ता.४) अकलूजमध्ये विजयसिंह यांची भेट घेतली.
इंदापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा काँग्रेससाठी सोडावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीकडे केली होती. मात्र राष्ट्रवादीने याबाबत त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. ही जिंकलेली जागा सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाही. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात हर्षवर्धन पाटलांनी अकलूजला जाऊन विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान दोघांनीही बंद खोलीत साधारण तासभर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते. त्यानंतर आजच निर्णय घेत असल्याचे सांगून हर्षवर्धन पाटील रवाना झाले. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून विजयसिंह यांनी भाजपला पाठिंबा दिला. तर त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तर थेट भाजपमध्येच प्रवेश केला. आता पुणे जिल्ह्यातून हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपमध्ये आणण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यासाठी हर्षवर्धन यांनी भाजप प्रवेशासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली असून ते या बैठकीत त्यांच्या पक्षांतराची घोषणा करु शकतात ,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.