नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण व सुशोभीकरणासाठी संधी मिळाली, ही बाब माझ्या आयुष्याला प्रेरणादेणारी आहे. डॉ. आंबेडकरांचे कार्य हे जीवनाला योग्य दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल आहेर यांनी देवळा येथे केले.
देवळा शहर व तालुक्यात विविध विकासकामांच्या शुभारंभांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावरण व सुशोभीकरण कार्यक्रमाप्रसंगी डॉ. आहेर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष केदा आहेर हे होते. याप्रसंगी बोलताना डॉ. आहेर म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते होत आहे, ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आहे. याशिवाय ग्रामस्थांची एकजूट ही सर्वांसाठी आदर्श असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कळवण तालुका दलित शिक्षण प्रसारक मंडळाच्या आनंद विद्यार्थी आश्रमाच्या प्रांगणात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे आ. आहेर यांच्या विकासनिधीतून सुशोभीकरण करण्यात आले आहे.
मटाणे येथील तलाठी कार्यालय, गुंजाळनगर येथे पेव्हर ब्लॉक, देवळवाडी येथे रस्ता काँक्रिटीकरण, वाखारवाडी येथे रस्ता काँक्रिटीकरण, पिंपळगाव येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम व देवळा नगरपंचायत हद्दीत सप्तशृंगीनगर येथे काँक्रिटीकरण या विकासकामांचे उद्घाटन आ. आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष आहेर यांच्यासह नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर, उपनगराध्यक्ष अतुल पवार, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी बी. जी. वाघ, डी. के. अहिरे, एकनाथ जगताप, कारभारी आहिरे, अशोक पवार, पोपटराव गांगुर्डे, सुधाकर पवार, बाबूलाल गांगुर्डे, भाऊराव अहिरे, जालंदर हिरे, केशव पवार, भारत जगताप, गुलाबराव वाघ, नामदेव जगताप, पिकाका सोनवणे, कैलास पवार, शांताराम पवार, कैलास पवार, प्रदीप पवार, दयानंद पवार, स्वप्निल सावंत, मिलेश निकम यांच्यासह देवळा नगरपंचायतीचे सर्व गटनेते व नगरसेवक, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती, उपसभापती, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.