मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप – शिवसेनेमध्ये मेगा भरती सुरु आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांसह अनेक दिग्गज नेते देखील पक्षांतर करत आहेत. यामध्ये नुकतेच भाजप प्रवेश करू इच्छिणाऱ्या विविध नेते मंडळांची तसेच आजी, माजी आमदार-खासदारांची यादी व्हायरल झाली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह तब्बल दहा जणांचा यात समावेश आहे. येत्या १ सप्टेंबरला हे सर्वजण भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर तसेच जनतेत असलेल्या मोदी लाटेमुळे राज्यातील विरोधी पक्षांतील नेते व आमदारांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला आहे. सत्ताधारी शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. त्यातही विरोधी आमदारांचा कल भाजपकडे अधिक आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर काही दिवस उरले असताना पक्षांतराला अधिकच वेग आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, सोलापूरचे बबन शिंदे, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, सिद्धराम म्हेत्रे, आमदार जयकुमार गोरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढेच नाही ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. अर्थात, यातील अनेक नेत्यांनी अद्याप भाजप प्रवेशाला स्पष्ट कौल दिलेला नाही.