मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संसदेत मला भेटले की, नेहमी माझ्या कपड्यांचे कौतुक करतात. त्यामुळे राजकारणापलीकडे मैत्री जपली पाहिजे, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले. वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणू ते बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांच्यासह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात आठवले यांचा नॅब संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, हेमंत टकले यांचा पक्ष वेगळा असला, त्यांच्या पक्षाशी आमची युती नसली, राजकीय भूमिका वेगळी असली तरी मैत्री कायम जपण्याचे काम टकले यांनी केले आहे. त्यांच्या निमंत्रणावरून या कार्यक्रमाला मी उपस्थित राहीलो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संसदेत मला भेटले की, नेहमी माझ्या कपड्यांचे कौतुक करतात. त्यामुळे राजकारणापलीकडे मैत्री जपली पाहिजे, असे आठवले म्हणाले. जे कधीच कुणापुढे नाही झुकले त्यांचे नाव आहे हेमंत टकले ! अशी एक शीघ्र कविताही आठवले यांनी टकले यांच्यासाठी सादर केली.
आठवले म्हणाले, दृष्टिहीन आणि विविध दिव्यांगजनांसाठी मागील पाच वर्षांत केंद्र सरकारने आठ हजार एडीप कॅम्प लावून 13 लाख 54 हजार दिव्यांगजनांना सहाय्यक उपकरणांचे वाटप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अपंगांना दिव्यांगजन हा पर्यायी शब्द दिला आहे. दिव्यांगजनांचे नोकरीतील आरक्षण चार टक्के केले आहे. राज्य आणि केंद्र सरकारमधील दिव्यांगजनांचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.
Visit : bahujannama.com