मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र्र शासनाने राजर्षि छत्रपती शाहू शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरु केलेली आहे . हि शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. त्यावर मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
राजर्षि छत्रपती शाहू शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य सरकारने वाटेकरी आणल्याने मराठा समाजामधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले, की राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही केवळ मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयाकडे प्रलंबित असताना मराठा विद्यार्थ्यांसाठी झगडून मिळवलेल्या शिक्षणाच्या सवलतीवरही अशा पद्धतीने घाला घालणे हा त्यांच्या बरोबर झालेला अन्याय आहे.
मराठा क्रांती मोर्चानंतर राज्य सरकारने समन्वयकांशी चर्चा केली. त्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी यासाठी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. मात्र आता खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या मागासांनाही ही योजना लागू होणार असल्याने या योजनेचे लाभार्थी वाढणार आहेत. त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी पसरली आहे.