बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबईत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयीच्या पोस्टरने खळबळ उडवून दिली होती. ही घटना ताजी असतानाच आता मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावलेल्या पोस्टरमुळे चर्चेला ऊत आला आहे. मनसेनं थेट दादर येथील शिवसेना भवनासमोरच ही पोस्टरबाजी केली आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर भगव्या रंगात असून त्यावर एका बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो आहे. ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे हे पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
येत्या २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने मुंबई येथे मनसेचे अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वीच मुंबईत मनसेने ही पोस्टरबाजी सुरु केली आहे. याबाबत बोलताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकटे आली तेव्हा तेव्हा राज ठाकरे आणि मनसे उभी राहिली आहे. या पोस्टरच्या माध्यमातून कोणालाही डिवचण्याचासाठी आमचा हेतू नाही, असेही देशपांडे यांनी सांगितले.
तसेच यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले ,आम्ही महाराष्ट्र धर्माचे पालन करत आहोत. सत्तेसाठी सगळे येत आहेत. पण महाराष्ट्र धर्माचे पालन होताना दिसत नाही, असे म्हणत त्यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाण साधला. तसेच राज्यात सत्तेवर आलेले सरकार म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात… असा टोला देखील त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.