Dheeraj Ghate On Pubs In Pune | शहरातील अनधिकृत पबवर आता भाजपचे कार्यकर्तेच ऍक्शन घेणार ! शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री; भाजपचे शहरअध्यक्ष धीरज घाटे यांचा सरकारला घरचा आहेर
पुणे: – Dheeraj Ghate On Pubs In Pune | राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या शहर शाखेने मंगळवारपासून शहरातील अनधिकृत पबवर त्यांच्या पद्धतीने ‘ऍक्शन’ घेण्याचा इशारा देतानाच शहरातील सर्व पब हद्दपार करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. शहरअध्यक्ष धीरज घाटे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा देतानाच शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गुटखा विक्री होत असल्याची ‘सत्य’ परिस्थिती मांडत शासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
महिन्याभरापुर्वी कल्याणीनगर येथील पबमधून निघालेल्या प्रतिथयश बांधकाम व्यावसायीकाच्या मुलांने दोघांचा बळी घेतल्यानंतर शहरातील पब संस्कृतीच्या आड सुरू असलेला गोरखधंदा चव्हाट्यावर आला. यामुळे शासनाची नाचक्की झालीच. यातून मोठ्याप्रमाणावर कारवाई सुरू झाल्यानंतरही काल फग्युर्सन रस्त्यावर एका पबमध्ये रात्री उशिरापर्यंत दारू विक्री आणि पार्टी सुरू असल्याचे या ठिकाणी अंमली पदार्थांचेही सेवन सुरू असल्याचे उघड झाले. यामुळे पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणा आणि पब चालकांचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेवरून पुन्हा सत्ताधारी विरोधकांच्या रडारवर आले. पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत एका पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचारी निलंबीत केले.
या पार्श्वभूमीवर भाजपचे शहरअध्यक्ष धीरज घाटे यांनी महापालिका, पोलिस, पीएमआरडीए आणि उत्पादन शुल्कचे आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविली आहे. त्यामध्ये पुण्यात सुरू असलेले सर्व पब हद्दपार करण्याचा निर्णय राज्य शासनाने तातडीने घ्यावा. शहर आणि जिल्ह्यातील अधिकृत पब ची यादी प्रसिद्ध करावी . गणेशोत्सवाप्रमाणेच रात्री दहानंतर पबमधील स्पीकर बंद करावेत. पब व अन्य अवैध धंद्यांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करावी. त्यावर येणार्या तक्रारींची दखल घ्यावी. शहरातील अंमली पदार्थ व्यापार थांबविण्यासाठी पोलिसांनी काय प्रयत्न केले याची माहिती द्यावी. रात्रीच्यावेळी वेगाने गाड्या चालविणारे आणि अश्लिल चाळे व आरडाओरडा करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करतानाच मंगळवारपासून अनधिकृतपणे सुरू असलेल्या पबवर भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने ‘ऍक्शन’ घेतील, असा इशाराही दिला आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे त्या संदर्भात आमच्याकडे महत्वपूर्ण माहिती आली असून लवकरच गुटखे विक्रेत्यांचा आणि त्यांना सपोर्ट करणार्यांचा पर्दाफाश केला जाईल, असे स्पष्ट करत राज्य शासनालाच आव्हान दिले आहे.
Comments are closed.