कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात आणखी दोन स्थानिकांचा सहभाग असल्याची कबुली या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याने दिली आहे. त्या दोघांना लवकरच अटक करण्यात य़ेणार असल्याचे संकेत विशेष तपास पथकाने दिले आहेत.
शरद कळसकर याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत सोमवारपर्यंत होती. सोमवारी त्याला न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले. तेव्हा त्याला न्यायालयाने ८ जूलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एसआयटीने शरद कळसकर याच्याकडे मागील चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत तपास केला. चौदा दिवसांच्या कोठडीत एसआय़टीने त्याला औऱंगाबाद येथे नेऊन तपास केला. त्याच्या शेतातही पाहणी केली. त्याने मोबाईल, डायरी शेतात जाळल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर तपास करण्यात आला. पहिल्या सात दिवसात पोलिसांनी बेळगावमध्ये झालेल्या बैठकीची ठिकाणे आणि साक्षीदार यांची तपासणी केली. त्यावेळी त्याने या प्रकरणात आणखी दोघांचा समावेश असल्याची कबूली देत दोघांचे वर्णन सांगितले.
त्यानुसार एसआयटीने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करत पोलीस कोठडीची मागणी केली. त्या दोघांची माहिती उपलब्ध केली आहे. त्यामुळे लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे एसआयटीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ते दोघेही एका सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे. असे एसआयटीकडून सांगण्यात आले.