सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – पोलीस निरीक्षकाला दमदाटी केल्याप्रकरणी आ. भारत भालके व इतरांविरूध्द दाखल गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्याचे कारण पुढे करीत पोलिसांनी अचानक संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. या प्रकारामुळे पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडने पोलिसांच्या या भूमिकेचा तीव्र निषेध केला असून माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्यानेच भाजप सरकार दडपशाही करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अचानक संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांच्या दाळे गल्ली येथील निवासस्थानाची १० ते १५ जणांच्या पोलीस पथकाने तपासणी केली. कांही संशयित घाडगे यांच्या घरात असल्याची माहिती मिळाल्यावरून ही शोधमोहीम राबविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, अचानक झालेल्या या कार्यवाहीने शहरभर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले. नुकतीच येथे पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या १८ जागा लढविणार असल्याची घोषणा घाडगे यांनी केली होती. याचवेळी माढ्यातून विश्वंभर काशीद व सोलापुरातून श्रीमंत मस्के यांची उमेदवारीही जाहीर केली होती. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारेही सरकार आणि पोलिसांच्या या कार्यवाहीचा निषेध नोंदविला आहे.