मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात शनिवारी झालेल्या राजकीय भूकंपामुळे जवळपास संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. अजित पवारांच्या भाजप पाठिंब्याच्या निर्णयावर जनतेसोबतच अनेक मोठ्या नेत्यांनी भाजप आणि अजित पवारांना लक्ष्य केले आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील या राजकीय नाट्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात राज अजित पवारांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांनी एकत्र बसून सरकार बनवण्याची तयारी केली होती. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ व काँग्रेसचे ४४ अशी १५४ आमदारांची संख्या अधिक पाठिंबा दिलेले अपक्ष सभासद मिळून ही संख्या १६९-७० च्या आसपास जाते. pic.twitter.com/z1s5xiIego
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 23, 2019
राज ठाकरेंनी सोलापूर येथील सभेत अजित पवारांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले होते. राज म्हणाले कि, सकाळी लवकर उठून तुम्ही काय करता? ५०-५२ वर्षाचे झाले तर काकाच्या जीवावरच जगतात, किती दिवस जगणार. काकांनी हात काढला तर पानपट्टीवालाही विचारणार नाही, अशी जहरी टीका राज यांनी अजित पवारांवर केली होती. दरम्यान, आताच्या राजकीय परिस्थिला तो व्हिडिओ अनुचित ठरवुन अनेकांकडून तो व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.
वास्तविक, अजित पवार यांनी आपल्या पक्षाविरुद्ध बंड केलंय. अजित पवार यांनी शरद पवारांच्या सहमतीशिवाय भाजपला पाठिंबा दर्शवत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांशी संपर्क करुन त्यांची बैठक बोलावली. तसेच अजित पवारांच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून राज ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.