लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकीवरुन येऊन साखळीचोरी करणारे दोन सराईत लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून जेरबंद करण्यात आले असून त्यांना न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
या विषयी लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात लक्ष्मी नारायण सलगर रा. बी जे एस कॉलेजजवळ, वाघोली पुणे या भाजी खरेदी करून बकोरी फाटा येथून घरी परत असताना त्यांच्या लक्षात आले की भाजी खरेदी करत असताना त्यांचे गळ्यातील मणी मंगळसूत्र कोणीतरी चोरट्याने काढून नेले यावर त्यांनी लोणीकंद पोलिस स्टेशन गुन्हा दाखल केला. यावर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ त्याठिकाणी भेट देऊन घडलेला प्रकार समजून घेतला. तसेच गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु आरोपी मिळून आले नाहीत.
त्यानंतर दि. 30/11/2019 रोजी वाघोली गावचे हद्दीत हे पथक पेट्रोलिंग करीत असताना एका संशयित व्यक्ती दिसला त्यास हटकले असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत म्हणून त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे (नाव धनराज शांतीलाल शेरावत (वय 18 वर्षे) रा. सराटे वस्ती, सनी गोड कंपनीशेजारी, सणसवाडी, ता शिरूर, जि पुणे) असे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता हा गुन्हा धनराज शेरावत, अक्षय शेरावत आणि अरमान नानावत यांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे.
दि. 02/12/2019 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावर वरिष्ठांच्या आदेशाने वढू खुर्द गावचे हद्दीतून (अरमान प्रल्हाद नानावत (वय 20 वर्षे), रा. पोटफोडे वस्ती, बजाज इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या मागे, वढू खुर्द ता. हवेली, जि पुणे) यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील एकूण 60,000/- रु किं चे मिनी गंठण व सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर आरोपी हे रेकॉर्ड वरील असून त्यांचेवर वाकड, चंदननगर, सांगवी या पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई डॉ. सई भोरे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक हणमंत पडळकर, महिला पोलीस उप निरीक्षक वर्षा जगदाळे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, समीर पिलाने, ऋषीकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांनी ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाळकृष्ण वाडेकर हे करीत आहेत.