बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरात गेले दोन दिवसापासून आकाश ढगाळ राहत आले असताना आज सकाळी शहराच्या विविध भागात पावसाचा हलका शिडकावा(Heavy showers ) सुरु झाला आहे. त्याचबरोबर थंडगार वारे वाहत असल्याने थंडीचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्रामुळे गेले काही दिवस संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण आहे. मुंबई, कोकण भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरातही पाऊस सुरु झाला आहे. पनवेल, अलिबाग येथे पावसाचा जोर अधिक दिसून येत आहे.
पहाटेपासून शहरात सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून येते होते. पुण्यात आज सकाळी किमान तापमान १७.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. त्याबरोबर बोचरे वारे वाहत असल्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडताना रेनकोट घ्यावा की स्वेटर असा संभ्रम पुणेकरांमध्ये निर्माण झाला होता.
पुण्यातील शिवाजीनगर, वाघोली, हडपसर, धनकवडी भागात सकाळी नऊ वाजल्यापासून हलक्या पावसाला सुरुवात झाली. काही वेळाने या पावसाचा जोर वाढत चालला आहे. कोथरुड, वारजे, शिवाजीनगर भागात तर पावसाळ्यासारख्या पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत.