नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये असणारी गुगलची कार्यायले सुरु करण्यासंदर्भातील निर्णय झाला आहे. 10 टक्के कर्मचार्यांच्या उपस्थितीमध्ये 6 जुलैपासून कार्यालये सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सप्टेंबरपर्यंत कर्मचारी संख्या 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच घरुन काम करणार्यांसाठीही कंपनीने 75 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
गुगलबरोबरच फेसबुकनेही मार्चच्या सुरुवातीपासूनच कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करण्याची मूभा दिली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता. घरुन काम करणार्या कर्मचार्यांना गुगलने एक हजार डॉलर किंवा या मुल्या इतका निधी प्रत्येक देशात देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. घरुन काम करण्यासाठी आवश्यक असणार्या गोष्टी मग अगदी इलेक्ट्रीक गॅजेट्सपासून ते फर्निचरपर्यंतच्या गोष्टी घेण्यासाठी हा निधी देण्यात येणार असल्याचे गुगलने म्हटले आहे.
2020 वर्ष संपेपर्यंत अनेक कर्मचारी घरुन काम करण्याची शक्यता अधिक असल्याने हा निर्णय कंपनीने घेतला आला आहे. या वर्षी प्रत्यक्ष कार्यालयामध्ये उपस्थित राहून काम करणार्या कर्मचार्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सर्वच कंपन्या प्रयत्न करत आहेत. गुगलनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये मर्यादित कर्मचार्यांना रोटेटिंग पद्धतीने आळीपाळीने कामावर बोलवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.