जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – खंडणी मागत पिस्तूलाचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे यांना अटक करण्यात आली आहे. वादाचे कारण एक महिला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. कोल्हेच्या अटकेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर 16 जानेवारी 2020 रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. सीसीटीव्ही फुटेज मध्येही अमानुष मारहाण रेकॉर्ड झाली होती. यातील मुख्य संशयित असलेले कोल्हे यांना तब्बल चार महिन्यांनंतर अटक करण्यात आली. या गुन्ह्यात आत्तापर्यंत सहा संशयितांना अटक केली आहे. अटकेतील पाच जणांचे अंतरिम जामीन अर्ज 26 मे रोजी कोर्टाने फेटाळले होते. खुबचंद साहित्या यांच्या मुलाच्या नावावर असलेली महागडी चारचाकी त्यांनी माजी महापौर ललित कोल्हे यांना दिली होती. ही चारचाकी परत मागितल्यानंतर कोल्हे यांनी देण्यास टाळाटाळ केली. तसेच साहित्या यांच्याकडून खंडणी मागितली होती. 16 जानेवारी 2020 रोजी रात्री साडे आठ वाजता शहरातील गोरजाबाई जिमखाना येथे साहित्या गेले असता यावेळी ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होती. पिस्तूलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला होता.
या घटनेनंतर ललित कोल्हे 3 महिन्यांपासून फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ललित कोल्हेंवर पाळत ठेवली होती. ललित कोल्हे हे रामानंदनगर परिसरात आल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून कोल्हे यांना ताब्यात घेतले होते.