पुणे : बहुजननामा ऑनलाईन – “आर्टिकल 15” सत्यकथा हा चित्रपट 28 जून 2019 रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रखर विरोध दर्शविण्यात आला आहे. संविधानातील कलम 15 हे सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार व जातीभेद न करणे हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट सर्व नागरिकांनी पाहता यावा. यासाठी गनिमी कावा युवा सेवा संघटनेकडून चित्रपटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच चित्रपटाला संरक्षण व प्राईम टाईमला जास्तीत जास्त थिएटर मिळावेत अशी मागणी केली आहे.
“आर्टिकल 15” हा संविधानातील सर्व समान अधिकार प्राप्ती विषयी व जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट २८ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. परंतु काही असामाजिक, मनुवादी संघटनांनी जाहीररित्या पत्रकार परिषद घेऊन चित्रपट प्रदर्शनाला विरोध करत असंवैधानिक कृत्य करण्याचे जाहीर केले आहे. या विरोधात गनिमीकावा युवा सेवा संघाने पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. चित्रपटाच्या समर्थनार्थ गनिमी कावा युवा सेवा संघ ठामपणे उभा असून बहुजनांनी निर्भीडपणे हा चित्रपट पाहावा असे खुले आव्हान केले आहे. तसेच संघटनेला वेळ पडल्यास प्रेक्षकांना संरक्षणही देईल. असे गनिमी कावा युवा सेवा संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे यांनी सांगितले.
संविधानातील आर्टिकल 15 हा सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार असून कुठल्याही व्यक्तीला जातीभेद करण्याचा अधिकार कोणालाही प्राप्त नाही. मग तो उच्च जातीचा असो किंवा मागासवर्गीय असो किंवा मुस्लीम असो. हेच उद्दिष्ट आहे की चित्रपटामार्फत नागरिकांना संविधानातील आर्टिकल 15 कळावे. तसेच “आर्टिकल 15” चित्रपटाच्या समर्थनात महाराष्ट्रातल्या अनेक संघटनांनी देखील आम्हाला जाहीर पाठिंबा दिला आहे. वेळप्रसंगी चित्रपटाच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावरही उतरू. असेही गनिमी कावा युवा सेवा संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे यांनी सांगितले.
याप्रसंगी गनिमी कावा युवा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मोनालीताई विधाते, पश्चिम महाराष्ट्र छावा संघटनेचे अध्यक्ष नागेश चव्हाण, क्रांती मजदूर सेनेचे अध्यक्ष अर्जुन ओव्हाळ, मास मुव्हमेंट संघटनेचे अध्यक्ष विजय जगताप, भीमशक्ती संघटनेचे सचिव विजय हिंगे उपस्थित होते.
चित्रपट महामंडळाला व पोलिस आयुक्तांना गनिमी कावा युवा सेवा संघाच्या प्रमुख मागण्या
* पोलिसांनी आर्टिकल 15 चित्रपटाच्या प्रेक्षकांना संरक्षण देण्यात यावे.
* चित्रपट महामंडळाने सर्व चित्रपट गृह मालक व व्यवस्थापनाने चित्रपटाचे खेळ प्राईम टाईम म्हणजेच सकाळ,दुपार व सायंकाळी मल्टिप्लेक्स थिएटर व सिंगल पडदा थेटरला जास्तीत जास्त शो मिळावे.
* चित्रपट प्रदर्शन आता प्रेक्षकांना त्रास देऊन पाहणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी.