सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – बेपत्ता झालेल्या अॅड. राजेश कांबळे यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते एका पोत्यात भरुन ठेवलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. कांबळे यांचा खून अंगावरील सोने व पैशासाठीच झाला आहे. आजवरच्या तपासात अन्य कोणतेही कारण पुढे आले नाही. त्यामुळे आणखी चौकशी सुरू आहे. अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त महावीर सकळे यांनी दिली आहे.
अॅड. राजेश कांबळे यांचा खून दि. ८ जून २०१९ रोजी बंटी खरटमल याच्या पांडुरंग वस्ती येथील राहत्या घरी झाला. त्यानंतर जवळपास चार दिवसानंतर हा खून उघडकीस आला. या प्रकरणी संजय उर्फ बंटी खरटमल याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबावरून अॅड. सुरेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले. सुरेश चव्हाण याला १५ जून २०१९ रोजी न्यायालयात उभे केले असता १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. कोठडीमध्ये बंटी खरटमल व सुरेश चव्हाण या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. आजवरच्या तपासात बंटी खरटमल याने अॅड. राजेश कांबळे यांच्या अंगावरील सोने व पैशासाठीच खून केल्याचे सांगत आहे.
बंटीच्या जबाबावरून अटक करण्यात आलेला दुसरा संशयित आरोपी अॅड. सुरेश चव्हाण हादेखील पोलीस कोठडीत आहे. मात्र तो पोलिसांच्या चौकशीला प्रतिसाद देत नाही.आजवरच्या कालावधीत सर्वांगाने तपास करण्यात आला आहे. मात्र तपासातून काही निष्पन्न झाले नाही.
चहातून दिल्या होत्या गुंगीच्या दहा गोळ्या…
अॅड. राजेश कांबळे याचा खून करण्याच्या अगोदर बंटी खरटमल याने कांबळे यांना घरी घेऊन जात चहामध्ये झोपेच्या १० गोळ्या टाकून दिल्या. झोपेच्या गोळ्या अॅड. सुरेश चव्हाण याने दिल्या होत्या, असे बंटी खरटमल याने सांगितले आहे. त्यामुळे याचा सखोल तपास होण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचाही युक्तिवाद फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला.