गडचिरोली : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील केवळ एकमेव ग्रीन झोन असलेल्या गडचिरोलीतही आता कोरोनाने शिरकाव केला आहे. सोमवारी सकाळी आलेल्या अहवालात तिघे जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. हे तिघेही बाहेरुन आले होते. त्यांना संस्थात्मक विलिगीकरण कक्षात घेण्यात आले होते.
लॉकडाऊन १ सुरु झाला तेव्हा राज्यात बीड, सिंधुदुर्ग, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर असे काही मोजके जिल्हे ग्रीन झोनमध्ये होते. पण लॉकडाऊनच्या काळात अन्य जिल्ह्यात बाहेरुन प्रवासी आले व त्यातून अन्य जिल्ह्यांमधील पॉझिटिव्ह केसेस आढळून येऊ लागल्या. गेली ५४ दिवस फक्त गडचिरोली हा राज्यातील एकमेव जिल्हा होता की तेथे एकही कोरोना बाहित आढळून आला नव्हता.
मात्र, अन्य राज्यातून मजूर, प्रवासी वेगवेगळ्या राज्यात गडचिरोली मार्गे जाऊ लागले. त्यातून जिल्ह्यातील कोरोनाची भिती वाढली होती. अन्य ठिकाणाहून गडचिरोलीला आलेल्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे. त्यातील तिघांचे रिपोर्ट सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे तब्बल ५४ दिवस ग्रीन झोन असलेल्या गडचिरोलीही आता पॉझिटिव्ह असलेल्या जिल्ह्यांच्या नकाशावर आला आहे.