अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – शिवछत्रपती बहुउद्देशीय व शिव साम्राज्य संस्थेच्या वतीने फरशी स्टॉप स्थित मैदानावर शिवरत्न सोहळा आज २६ फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात येत आहे. २७ पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचल राहणार आहे. याबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली.
दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यादरम्यान शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ‘पराक्रमा पलीकडे शिवराय’ या विषयावर प्रशांत लवटे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच मराठी भाषा दिनानिमित्य देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता आर्थिक मदत संस्थेच्या वतीने केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी याकरिता शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील छायाचित्राचे प्रदर्शन येथे असणार आहे.
दरवर्षी शिवरत्न सोहळ्याचे आयोजन शहरात थाटात करण्यात येते. यावेळी २६ व २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामध्ये क्रीडा, संगित, चित्रकला, वादविवाद स्पर्धा, तसेच होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता मदत या सोहळ्याच्या निमित्याने केली जाणार आहे. सोबत शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षात्कार या दरम्यान केला जाणार आहे. यामध्ये महाराजांवर व्याख्यान, किल्ले प्रदर्शनी असे विविध कार्यक्रम या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. सोहळ्याचे उद्घाटन भाजपाच्या सीमा सवळे यांच्या हस्ते होणार आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख मंगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनानंतर नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.