जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – सत्ता स्थापन न झाल्याने भाजप पक्षातील अंतर्गत नाराजीचे प्रमाण वाढले आहे. त्यात भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमांसमोरच टीका केल्याने हा वाद वाढला होता. याच पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रस्तरीय ५ जिल्ह्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दुपारी जळगावातील औद्योगिक वसाहत भागातील खासगी रिसॉर्टवर हि बैठक सुरू होती, दरम्यान, खडसेंनी त्या बैठकीला अचानक उपस्थिती लावल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्यांची नाराजी कायम असल्याचे दिसून आले.
बैठकीतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ खडसे प्रचंड नाराज असल्याचं जाणवले. आपणाकडे सर्व पुरावे नावानिशी आहेत. ते पुरावे प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने सर्वांसमोर मांडणार आहे. तसेच गिरीश महाजन यांनी पुरावे मगितल्याच्या वृत्तावर आलेल्या सोशल मीडियावरील कंमेंटच्या झेरॉक्स काढल्या असून, त्या प्रदेशाध्यक्षांकडे देणार असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान, या बैठकीला खासदार रक्षा खडसे व रोहिणी खडसेसुद्धा उपस्थित होत्या.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव करणाऱ्यांची नावे एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे त्यांनी ती नावे गुप्त न ठेवता पुराव्यानिशी थेट जाहीर करावीत, असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिले होते. कुणीच कुणाला पाडत नसते. त्यांना अपयश आले, याचे आम्हालाही वाईट वाटते.
मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे हे यापूर्वीही अॅड. रवींद्र पाटील यांच्याविरोधात १२०० मतांच्या फरकाने आणि मागील निवडणुकीत प्रचंड मोदी लाट असतानाही केवळ ८५०० मतांनी निवडून आले आहेत. यावेळी खडसे यांना तिकीट नाकारल्यानं फरक पडल्याचं त्यांनी सांगितलं होतं.