अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० या युवा सांस्कृतिक कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांच्यासह रोहित पवार, अदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख आणि झिशान सिद्दीकी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत गुप्ते यांनी केले होते. त्यांनी तरुण आमदारांशी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांना अवधूत गुप्ते यांनी रॅपिड फायरमध्ये सर्वात जास्त प्रेम कोणावर आहे ? अमित देशमुख की रितेश देशमुख ? असा प्रश्न विचारला. तेव्हा रितेश देशमुख यांच्यावर जास्त प्रेम असल्याचे धीरज यांनी सांगितले.
तसेच आगामी काळात मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल ? रोहित पवार की आदित्य ठाकरे ? असा प्रश्न विचारल्यावर हे महाराष्ट्रानेच ठरवायचे आहे, असे उत्तर धीरज यांनी दिले. तसेच दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागितला होता. त्यावरूनही संजय राऊत आणि उदयनराजे यांच्यापैकी नेमका कोणी धीर धरावा, असाही प्रश्न धीरज यांना विचारला होता. त्यावर धीरज यांनी संजय राऊत यांना टोला लगावत उदयनराजे हे राजे असून ते श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे बाकीच्यांनी धीर धरावा, असे धीरज म्हणाले.