नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरस पसरला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोनाविरूद्ध लढा देणयासाठी त्यांनी 50 अब्ज डॉलरची तरतूदही केली आहे. ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत 41 जणांचा मृत्यू झाला असून दोन हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमधील वुहान प्रांतातून पसरलेला कोरोना व्हायरस आतापर्यंत 114 देशांमध्ये पसरला आहे. जवळपास सव्वालाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे.चार हजारच्या आसपास लोकांचा यात मृत्यू झाला आहे.
चीनच्या तुलनेत युरोपीयन देशांमध्ये हा आजार वेगाने पसरत आहे. एकट्या इटलीमध्ये मृतांचा आकडा 1 हजार 266 झाला आहे. तर 17 हजार 660 लोकांना विषाणूचे संक्रमण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक देश आता खबरदारीचा उपाय करीत आहे. युक्रेनने परदेशी नागरिकांना सीमा बंद केली. त्याठिकाणाी तिघा जणांना संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. कोरोनो व्हायरसचा प्रादुर्भाव ऑफ्रिकन खंडातील सुमारे 18 देशांमध्ये झाला आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी देशात 15 दिवसांची आपत्कालीन परिस्थिती जाहीर केलीय.
चौकट- पर्यटक व्हिसा रद्द
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये भारत सरकारने 15 एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हिसा रद्द केले आहेत. त्यामुळे भारतात कोणीही परदेशी पर्यटक दाखल होऊ शकणार नाही. फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना भारताचा व्हिसा 15 एप्रिलपर्यंत मिळणार नाहीय. भारतात कोरोना विषाणूचे वाढत जाणारे संक्रमण पाहाता केंद्र सरकारे फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना तात्पुरती बंदी घातली आहे. नियमित व्हिसासह ई व्हिसावरही आता बंदी असणार आहे.
देशात कोरोनाने घेतला दुसरा बळी
कोरोनाच्या संक्रमणामुळे देशात दुसरा बळी गेला आहे. दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही आज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अहमदनगरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईतही आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झाले आहे. मुंबईत आता 4, पुण्यात 10, नागपुरात 3 तर ठाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्यात एकूण 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.