पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे राज्य शासनाने सर्व देवस्थानांच्या यात्रा रद्द केल्या आहेत. राज्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासकीय समितीने घेतला आहे. चैत्र महिन्यात येथे चैत्री यात्रा होत असते. यात्रा काळातील देवीचे सर्व धार्मिक विधी व पुजापाठ हे परंपरेनुसार केले जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांची ही कुलदेवता आहे.
बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे नेहमीच एकविरा देवीच्या दर्शनाला येत असत. मुंबई, ठाणे, पुणे परिसरात देवीचे भक्तगण मोठ्या संख्येने आहेत. याच भागात अनेकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून खबरदारी म्हणून यात्रा न भरविण्याचा निर्णय एकविरा देवस्थानाने घेतला आहे. वडगाव मावळ येथील प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आणि दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश, सचिव, मावळचे तहसीलदार, सदस्यासह धर्मादाय आयुक्त यांनी भाविक व वेहेरगाव ग्रामस्थ यांच्याशी बैठक घेत हा निर्णय जाहीर केला.
एकविरा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील वेहेरगाव गावात असून येथे चैत्री यात्रेकरिता संपुर्ण महाराष्ट्रासह कोकण, रायगड, ठाणे, मुंबई भागातून लाखो भाविक येत असतात. गर्दीमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याचा सर्वांधिक धोका असल्याने भाविकांनी गडावर गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.