नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे बारामतीकरांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला असून अध्यक्षांनी तो स्विकारला आहे.पवारांनी नेमका कोणत्या कारणामुळं राजीनामा दिला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूका येऊन ठेपल्या असताना अजित पवारांनी कशासाठी राजीनामा दिला याबद्दल तर्क वितर्क काढले जात आहेत. अनेक आमदार खासदार यांनी देखील बारामतीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून अजित पवार यांच्या राजीनाम्या मागची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी कोणालाही या राजीनाम्याची कल्पना दिली नव्हती हे समोर येत आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय व अजित पवार यांच्या निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी ज्यांच्यावर असते असे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी देखील फेसबुक वर एक पोस्ट टाकून अजित पवार यांचे समर्थन केले आहे.
किरण गुजर यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, दादा… तुम्ही अत्यंत भावनाशील आहात आपल्यामुळे कोणीही दुखावले जाऊ नये याची काळजी घेत असताना, तुम्ही सगळ्यांचीच मने जपली… बऱ्याच वेळा मनाला मुरड घालुन जवळच्यानाही गप्प बसवून बाजूला ठेवून बाकीच्यांची मने सांभाळलीत…. तुम्ही कायमच साहेबांचा आदर करीत आला आहात, काही झाले तरी साहेबाना दुखावले जाणार नाही, या साठी मला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल या बाबत तुम्ही कायमच ठाम आहात. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे समर्थक सर्वत्र आक्रमक होतांना दिसत आहे.
Visit : bahujannama.com