लखनऊ : बहुजननामा ऑनलाईन – लखनऊ येथील वजिरगंज कोर्टात एका देशी बॉम्बचा स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या स्फोटात अनेक वकील जखमी झाल्याची माहिती असून जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढेच नाही तर याठिकाणी आणखी दोन जिवंत बॉम्ब सापडल्याची देखील माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार बार असोशिएशनचे पदाधिकारी संजीव लोधी यांच्यावर हा बॉम्ब फेकण्यात आला होता. या हल्ल्यात संजीव लोधी वाचले आहेत.
अचानक स्फोटाचा आवाज आणि एकच खळबळ
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वकील संजीव लोधी यांच्या दिशेने हा देशी बॉम्ब फेकण्यात आला होता. मात्र, केवळ दैव बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून बचावले आहेत. दोन गटांमधील संघर्षाचा हा परिणाम असल्याचे पोलिसांनी सांगितले. अचानक स्फोटाचा आवाज झाल्यानंतर कोर्टात सगळीकडे खळबळ माजली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
अंतर्गत वादातून हल्ला
खरेतर हा बॉम्ब हल्ला एका वादातून झाल्याचे समजते आहे. संजीव लोधी यांचे आणि असोसिएशनचे सचिव जितेंद्र यादव उर्फ जीतू यांच्याशी भांडण होते अशी माहिती मिळत आहे. याच वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.जीतू आणि त्यांच्या समर्थकांनीच हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान संजीव लोधी हे लखनऊ बार असोसिएशनचे सहाय्यक सचिव आहेत. त्यांच्याच समोर ३ बॉम्ब फेकण्यात आले. यापैकी १ बॉम्ब फुटला तर २ बॉम्ब जिवंत हस्तगत करण्यात आले आहेत. यावेळी हल्लेखोरांनी पिस्तुल दाखवल्याची देखील माहिती आहे.