Anil Desai | प्रचारासाठी आलेल्या अनिल देसाईंसोबत काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची, मविआमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर (Video)

May 15, 2024

मुंबई : – Anil Desai | सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुका होत आहेत. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी लढत होत आहे. मात्र, मुंबईत महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील (Mumbai South Central Lok Sabha Constituency) ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई चेंबूर पांजर पोळ (Chembur Panjrapole) परिसरात प्रचारासाठी आले होते. त्यावेळी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करुन त्यांच्यासोबत बाचाबाची केली. तसेच त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितले.

ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे मतदारसंघात ठिकठिकाणी जाऊन सभा आणि बैठका घेत आहेत. चेंबूरमधील पांजर पोळ या ठिकाणी देसाई गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि देसाई यांच्या कार्य़कर्त्यांचा वाद झाला. अनिल देसाई यांनी याठिकाणाहून निघून जावं, त्यांनी या ठिकाणी प्रचाराला येऊ नये अशी भूमिका स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर दोन्ही गटात बराचवेळ बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

हा वाद कशामुळे झाला तसेच अनिल देसाईंना काँग्रेस कार्य़कर्त्यांनी विरोध का केला हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, शिवसेना (उबाठा) Shivsena UBT आणि काँग्रेसमध्ये हा वाद जुना असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुकीला अवघे चार दिवस राहिले असताना काँग्रेस आणि ठाकरे गटातील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून काय पावलं उचलली जातात हे पहावे लागेल.

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभेची जागा ही ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची जागा असून त्या ठिकाणी अनिल देसाई निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे आहेत. या मतदारसंघात विधानसभेचे अणुशक्तीनगर आणि चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन मतदारसंघ येतात. तर मुंबई शहर जिल्ह्यातले धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात.

Baramati Pune News | लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क