मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्याबाबत आदेश दिलेले असतानाही राज्य सरकारने मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. याच्या निषेधार्थ मंगळवार 26 फेब्रुवारी रोजी राज्यातील मगासर्वीय अधिकारी आणि कर्मचारी आझाद मैदानात निषेध रॅली काढणार आहेत.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 16 च्या उपकलम ‘4 अ’ नुसार अनुसूचित जाती आणि जमातींना पदोन्नतीत आरक्षण देण्याची सुस्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. या कलमाचा अर्थ आहे की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना सरकारी सेवेत पर्याप्त प्रतिनिधित्व मिळत नसल्यास या घटकांसाठी पदोन्नतीत आरक्षणाची तरतूद करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे .
30 ऑगस्ट रोजी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबाबतच्या देशभरातील 76 याचिकांवर निर्णय देताना मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी मागासलेपणा सिद्ध करण्याची अट रद्द करून आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र महाराष्ट्राच्या याचिकेवर निर्णय झाला नसल्याचे सांगत सरकार अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे. याच्या निषेधार्थ स्वतंत्र मजदूर युनियनचे अध्यक्ष जे. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली काढण्यात येणार असल्याचे सरचिटणीस एन. बी. जारोंडे यांनी सांगितले.