मुखेड : बहुजननामा ऑनलाइन – झारखंड राज्यातील एका २४ वर्षीय तरूणाची निर्घृणपणे हत्या केल्याने याचे पडसाद देशभरात उमटत आहे. झुंडबळीच्या विरोधात कायदा व दोषी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी शुक्रवार दि. २८ जुन रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर धरने आंदोलन करण्यात आले. यावेळी हाफिज अब्दुल गफार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. महामहिम राष्ट्रपती यांंना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
गेल्या तीन -चार वर्षापासून देशभरामध्ये काही उन्मादी वृत्तीच्या लोकांनी धुमाकूळ घालून सर्वसामान्य नागरिकांचे बळी घेण्यास सुरूवात केली. आतापर्यंत अनेकांचा बळी या झुंडशाहीने घेतला. १७ जून रोजी झारखंड राज्यातील तबरेज अन्सारी या तरूणाला बेदमपणे मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा देशभरामध्ये तिव्र निषेध होत आहे. दोषी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
यावेळी तबरेज अन्सारीच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यात यावे व कुटुंबातील एका व्यक्तीची शासकीय सेवेत सहभागी करून घ्यावे, ज्या पद्धतीने झुंडीने मिळून मुस्लिम तरूणाची हत्या केली त्यामागील कट्टरवादी विचार सरणी असून ती कट्टरवादी विचारसरणी पोसणार्या संघटनांना आळा घालण्यात यावा व इतर मागण्यासाठी धरने आंदोलन करण्यात आले. याआंदोलनात डाॅ.ए.पी.जे.अबुल कलाम समाजसेवा समिती, ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ, एस.एफ.आय, वंचित बहूजन आघाडी, भारीप, जस्टिस फाॅर मोहसीन मुव्हमेंटचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेकडो युवक सहभागी होते. यावेळी पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पि.एस.आय.असद शेख, मंडळाधिकारी यल्लावार यांना निवेदन देण्यात आले.