नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कहर माजवणाऱ्या आणि माणसांचा जीव घेणाऱ्या कोरोनाने आता पाळीव कुत्र्यांमध्ये देखील शिरकाव केला आहे. कोरोनामुळे कुत्र्याचा मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.
हाँगकाँगमध्ये कोरनामुळे एका 17 वर्षीय कुत्र्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता माहिती मिळत आहे की आणखी दोन श्वानांना हाँगकाँगमध्ये लागण झाली आहे. एका वृत्तानुसार मृत्यू झालेल्या श्वानाला त्याच्या मालकीणीकडून कोरोनाची लागणी झाली होती. माणसाकडून प्राण्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मृत्यू झालेल्या 17 वर्षीय या पॉमेरियन जातीच्या कुत्र्याला कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशन वार्डमध्ये खबरदारी म्हणून ठेवण्यात आले होते. 14 दिवसांच्या आयसोलेशननंतर या श्वानाला सोडून देण्यात आले होते. परंतु त्यानंतर दोनच दिवसात त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. यानंतर आणखी 2 वर्षांच्या जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाला कोरोनाची लागण झाली आहे, आणखी एका पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.