सातारा पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश असताना गैरहजर राहिल्याने झाली कार्यवाही
नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – १९ एप्रिल रोजी नांदेड पोलीस मुख्यालयातून अकरा पोलीस कर्मचाऱ्यांना तीन टप्प्याच्या पोलीस बंदोबस्तासाठी सातारा मुख्यालय येथे नेमण्यात आले होते . मात्र हे सर्व जण गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कर्तव्य कसुरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे . लोकसभा निवडणुकांच्या महत्वाच्या टप्प्यामध्ये सातारा पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश असताना गैरहजर राहिल्याने नांदेड जिल्ह्यातील अकरा पोलिसांवर लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये हवालदार कृष्णा मोतीराम चुनोडे (मांडवी) बाबूराव सूर्यवंशी (देगलूर), हवालदार गुलाब आडे (हिमायतनगर) ,एस एस हुजूरिया( वजिराबाद) मुनवर हुसेन (नांदेड) हवालदार गोपाळ तोटलवर (शिवाजीनगर) हवालदार देवानंद मोरे (लिंबगाव) विजय कोंडाजी धुळंगडे (कंधार) ,राजीव कांबळे व हवालदार मिलिंद लोणे (पोलीस ठाणे विमानतळ) ,साजिद पठाण (नांदेड) या अकरा जणांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे . जिल्हा विशेष शाखा नांदेडचे उपनिरीक्षक विजय पंतोजी यांनी फिर्याद दिली आहे .वजिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा गुंडगे तपास करत आहेत .