नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर न्यायालयात काम करणाऱ्या एका माजी कर्मचारी महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची अंतर्गत त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या आरोपांमधून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. आरोप लावणाऱ्या महिलेने सबळ पुरावे सादर न केल्याने हा निर्णय देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते .
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात प्रदर्शन करणाऱ्या सतरा महिलांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले.या बाबत नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त मधुर वर्मा म्हणाले की सदर महिलांना राम-लीला मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र त्यांनी नियोजित परवानगी दिलेल्या जागी निदर्शने न करता कॅनॉट प्लेस येथील मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर दोन जवळ प्रदर्शन केल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलं होत मात्र आता त्यांची सुटका करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.