भंडारा : बहुजननामा ऑनलाइन – गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रामध्ये लोधी समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे या मागणीला घेऊन लढा देत असलेल्या व लोधी समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महादेव मंदिर येथून मोहाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्रात लोधी समाजाच्या आरक्षणाकरिता हा मोर्चा धडकणार आहे. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोधी समाजबांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राणी अवंतीबाई लोधी ग्रुप व भंडारा जिल्हा लोधी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात मोडत असलेल्या लोधी समाजाला केंद्राच्या यादीतही ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याच्या मुख्य मागणीकरिता महादेव मंदिर येथून शनिवारी मोहाडी शहरात मोटारसायकल रॅली काढून मोहाडी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा व जनआंदोलन लोधी समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.केंद्राच्या यादीत ओबीसीत मोडत नसल्याने महाराष्ट्रातील सुमारे ४८ लाख लोधी समाजबांधवांना विविध लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यासाठी मराठा आरक्षणाच्या सरकारी घोषणेनंतर लोधी समाजाने पहिल्या टप्यात गोंदिया, यवतमाळ येथे आंदोलन केले.
मोटारसायकल रॅलीत जिल्ह्यातील हजारोच्या संख्येत समाजबांधवांनी उपस्थित राहावे, देशातील १८ राज्यात लोधी समाज निवास करीत असून १४ राज्यात लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. तर २ राज्यात लोधी समाज एस.टी.प्रवर्गात आहे. मात्र महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्यातील लोधी समाजाला अद्यापही केंद्राच्या इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने निर्णय न घेतल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्रातील लोधी समाजाकडून देण्यात आला आहे.