पुणे : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६२ वा महापरिनिर्वाण दिन सोहळा आहे. आजच्या दिवशी दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळतो. बाबासाहेबांच्या बद्दल काही खास गोष्टी ज्या कि आपणाला माहित नसतात अशा गोष्टी आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.
बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रगाढ ज्ञान त्यांनी त्यांच्या वाचन साधनेतून कमावले होते. त्यांनी आपल्या जीवनात जेवढ्या पुस्तकांचा संग्रह केला ती सर्व पुस्तके आपणाला मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात पाहण्यास मिळतात. तसेच त्यांच्या पुस्तकांचा संग्रह पाहून भारतरत्न मदन मोहन मालवीय थक्क झाले होते. त्यांनी लाखो रुपयांची रक्कम सांगून त्या सर्व पुस्तकांची मागणी केली होती. परंतु बाबासाहेबांनी त्यांना प्राणाहून प्रिय असणारी पुस्तके विकण्यास मालवीया यांना नकार दिला.
बाबासाहेबांचे आडनाव आंबेडकर नव्हतेच
बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर हे सैन्यात सुभेदार पदावर होते त्या ठिकाणी त्यांचे आडनाव सपकाळ असे होते परंतु बाबासाहेबांचे आडनाव आंबेडकर हे आडनाव त्यांच्या शाळेतील शिक्षक महादेव आंबेडकर गुरुजी यांनी शाळेत लावले आणि बाबासाहेबांनी तेच आडनाव पुढे चालवले. आंबेडकर गुरुजींचा त्यांच्यावर खूप आदर होता. कारण सबंध शाळेत बाबासाहेबांना समजून घेणारे आणि माणूस म्हणून वागणूक देणारे आंबेडकर गुरुजी एकमेव होते.
बाबासाहेबांचे प्राणी प्रेम
बाबासाहेबांनी त्यांच्या दिल्लीच्या घरी एक कुत्रा पाळला होता त्या कुत्र्यावर बाबासाहेबांचा माणसा सारखा जीव होता. १९४६च्या हंगामी सरकारात बाबासाहेब कामगार आणि बांधकाम विभागाचे मंत्री असताना त्यांचा कुत्रा आजारी पडला तेव्हा त्या कुत्र्याची देखरेख त्यांचा नोकर बघत असे. एके दिवशी आजारी कुत्र्याला जनावरांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले तेव्हा बाबासाहेब त्या कुत्र्याला रोज सकाळी मंत्रालयात जाताना बघायला जात असत. एकेदिवशी बाबासाहेब त्यांच्या निवासस्थानी बसले असता त्यांचा नोकर त्यांच्या कुत्र्याच्या मृत्यूचा निरोप घेऊन आला तेव्हा बाबासाहेबांना एवढे रडू कोसळे कि जणू जवळचा माणूसच त्यांना सोडून या दुनियेतून निघून गेला आहे. एवढे बाबासाहेब प्राणी प्रेमी होते.
बाबासाहेबांनी जोपासलेल्या कला
बाबासाहेबांनी दिव्य ज्ञान साधना केली. त्यांनी कित्येक मोठ्या पदावर काम केले तसेच त्यांनी अनेक लोक चळवळी उभा केल्या एवढ्या कामाच्या व्यापातूनही त्यांनी त्यांच्यातील कला जोपासली. बाबासाहेब उत्तम वोयोलिन वाजवत असत. त्याच प्रमाणे त्यांनी चित्रकलेची आवड हि जोपासली होती.