आंबेडकरांच्या प्रतिमेचे नाक आणि कान याचे नुकसान करण्यात आल्याचे दिसत आहे. सदर धक्कादायक घटनेमुळे दलित समाजात रोष व्यक्त केला जात असल्याचे दिसत आहे. उद्या ६ डिसेंबर रोजी आंबेडकरांचा ६३वा महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशातील पोडागंतयाडा भागात ही घटना घडली आहे.
पोडागंतयाडा हा भाग विशाखापट्टणम येथून जवळच आहे. मुख्य म्हणजे महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना करण्याची विशाखापट्टणममधील ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यांत याच जिल्ह्यातल्या मधुरवाडा भागात समाजकंटकांनी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीदिनाच्या एक दिवस आधी त्यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची एक घटनाही समोर आली होती. याशिवाय त्यावेळी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करीत गुन्हा देखील दाखल केला होता.
पुतळ्याची अशीच आणखी एक घटना म्हणजे त्रिपुरात भाजपा सत्तेत आल्यानंतर महान साम्यवादी नेते लेनिनचा पुतळा पाडण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे या घटनेमुळे राजकीय वातावरण खूपच तापले होते. याव्यतिरीक्त उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. परंतु या घटनेनंतर तेथील स्थानिक प्रशासनाने या पुतळ्याची डागडुजी करुन त्याला संपूर्ण भगव्या रंगात रंगवल्याचे समोर आले होते. यावेळी त्यावरूनही राजकारण बरेच पेटल्याचे समोर आले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात महापुरुषांच्या पुतळ्यांची तोडफोड करण्याचे सत्र सुरु झाले होते असं म्हणणंही काही वावगं ठरणार नाही.