मुंबई : बहुजननामा ऑनलाइन –
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विजयी रथाला रोखण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसची सर्व बोलणी झाली असून या आघाडीला दलित समाजातून हि पाठींबा दर्शविला जाऊ लागला आहे. युनाईटेड रिपब्लिकन पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
युनाईटेड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेन नन्नावरे, प्रदेशाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची भेट घेवून पाठिंबा दर्शवला. रामदास आठवले यांच्या दलित राजकारणाला शह देण्यासाठी अनेक दलित नेत्यांनी आपल्या पक्षाच्या आघाड्या उभारल्या आहेत. त्यापैकी युनाईटेड रिपब्लिकन पार्टी हा एक पक्ष आहे. या पक्षाचा मुंबईच्या दलित मतदारांमध्ये प्रभाव आहे. तसेच महाराष्ट्र भर संघटन पसरलेले आहे.
लोकशाही व संविधान विरोधी जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी आपण काँग्रेस आघाडीला समर्थन देत असल्याचे युनाईटेड रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी यावेळी जाहीर केले. या शिष्टमंडळात नितीन मोरे, आनंदराव निरभवणे, बाळासाहेब निर्मळे, प्रशांत नांदगावकर, उत्तमराव गायकवाड, अॅड. सादिक शिलेदार, उत्तमराव नवघरे आदी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी युनाईटेड रिपब्लिकन पार्टीचे आभार मानून विरोधी पक्षांच्या महाआघाडीत त्यांचे स्वागत केले.