पुणे : बहुजननामा ऑनलाइन – माळी महासंघातर्फे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या फुले दांपत्याला भव्य रॅलीचे आयोजन करून फुले दाम्पत्यांचा जयजयकार करत आभिवादन करण्यात आले.
१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या फुले दांपत्यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. इतकेच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या फुले दांपत्यांनी सुरु केलेल्या मुलींच्या शिक्षणासाठीची ही ज्ञानज्योत आज देशाला प्रगती पथावर नेत आहे. दरम्यान १ जानेवारी हा दिवस फुले दांपत्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माळी महासंघातर्फे सजण्यात आलेले रथ, लेझीम पथक, तसेच टाळ मृदूंग, महिला ढोल पथक, याचबरोबर फुले विचारांचे फलक, असलेले नागरिक आणि फुले दांपत्यांचा जयजयकार करत भव्य रॅली काढण्यात आली.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी सुरु करण्यात आलेली मुलींची पहिली शाळा भिडे वाडा येथून या भव्य रॅलीची सुरवात करून ती दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलीस चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलीस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप रस्त्याकडून येऊन फुले वाडा येथे या रॅलीचा समारोप झाला. दरम्यान माळी महसंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, अखिल भारतीय माळी महसंघाचे अध्यक्ष गोविंद डाके, महात्मा फुले वसतिगृहाचे अध्यक्ष दीपक जगताप, समाज प्रमुख जगन्नाथ लडकत, समाज प्रमुख राजाभाऊ रायकर, काळुराम उर्फ अण्णा गायकवाड, शहर संयोजक अश्विन गिरमे, पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक अतुल क्षीरसागर, जिल्हा संयोजक चंद्रशेखर दरवडे, प्रवीण बनसोडे, अनिल साळुंखे, महात्मा फुले मंडळाचे पिंपरी-चिंचवड प्रमुख हनुमंत माळी, रेखाताई रासकर, राखी रासकर, शारदा लडकत, संतोषअण्णा लोंढे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून माळी समाजातील बंधू-भगिनी, समविचारी व्यक्ती, कार्यकर्ते आणि फुले विचार प्रचारक – प्रसारक सहभागी झाले होते.