मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – न्यायालयाच्या शौचालयात लघुशंका करण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय बिल्डरचा गळा चिरुन खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीबीडी-बेलापूरमधील वाशी मॅजिस्ट्रेट कोर्टा सोमवारी ही घटना घडली. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नरेंद्र पटेल हा ३० वर्षीय बिल्डर कोर्टात आला होता. कोर्ट इमारतीत असलेल्या शौचालयात लघुशंका करण्यासाठी गेला असता हल्लेखोराने मागून येऊन धारदार चाकूने नरेंद्र पटेलचा गळा चिरला. या हल्ल्यानंतर पटेलने बचावासाठी आरडाओरडा केला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल केले. जखमी बिल्डरची प्रकृती सध्या स्थिर असून उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांनी दिली.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि ३०७ कलमानुसार हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर नरेंद्र पटेल याने दोन इस्टेट एजंटविरोधात नोव्हेंबर २०१७ मध्ये एका सिडकोच्या प्लॉट विक्रीबाबत फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या दोन आरोपींना अटक झाली होती. त्यानंतर या आरोपींपैकी एकाने पटेल यांना कार्यालयात येऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीचा या हल्ल्याशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करणार आहेत.