बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु असताना आष्टामधील महात्मा गांधी विद्यालयातील सातवीत शिकणाऱ्या प्रज्वल संदीप माळी या विद्यार्थ्याने सॅनिटायझर फवारणी करणारा रोबोट तयार केला आहे. कोरोना सारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर त्याने फवारणी करणाऱ्या रोबोटची निर्मिती करुन प्रयोगशीलता दाखवत विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने पुढाऱ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वानी हस्तांदोलन करण्याला रामराम ठोकला आहे. कोणत्याही वस्तूला कमीत कमी स्पर्श होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संसर्ग टाळण्याकरता सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. कोरोनाची बाधा झाल्याची सुद्धा कळत नसल्याने सर्वप्रकारची काळजी घेण्यात येत असून, बाधित रुग्णांसाठी मिरजेत कोविड रुग्णालयात रोबोट कार्यरत आहे. म्हणून कुटुंबातील लोकांनी बाहेरून आल्यावर जंतुसंसर्ग टाळण्यासाठी काळजी घेतली जात आहे. रोबोटकडून सॅनिटायझरची फवारणी केल्याने संसर्गाचा धोका कमी राहतो, या उद्देशाने त्याने हा रोबोट तयार केला आहे.
सुरक्षिततेचा उपाय म्हणून सॅनिटायजर फवारणी करणारा रोबोट प्रज्वलने तयार केला आहे. त्याच्या कल्पनाशक्तीचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. नगराध्यक्ष स्नेहा माळी, माजी नगरसेवक सतीश माळी, नगरसेविका पुष्पलता माळी, रमेश माळी, भारतीय विद्यानिकेतन शाळेच्या अर्चना गुरव, वैशाली कुरणे, अर्चना भानुसे यांनी सत्कार करुन प्रज्वलचे कौतुक केलं आहे.