नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका घेतल्या जात आहेत. त्यानुसार विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. त्यातच तृणमूल काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव समाविष्ट केले आहे. त्यावर आता काँग्रेसच्या नेत्याने शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्याने ‘पवारसाहेब प्रचाराला येऊ नका’, असे म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस-डावे अशी लढत होत आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत शरद पवार यांच्या नावाचा समावेश आहे. त्यावर काँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले, की ‘पश्चिम बंगालमध्ये येऊन तृणमूल काँग्रेसचा प्रचार करू नका. तुम्ही जर स्टार प्रचारक म्हणून बंगालमध्ये आल्यास त्यातून मतदारांमध्ये गोंधळ होईल. त्यामुळे तुम्ही तृणमूलचा प्रचार करणे टाळावे’, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, केंद्रीय नेतृत्त्वाकडून सुरु असलेले हल्ले पाहता लोकशाहीचा आदर करणाऱ्या कोणत्याही पक्षाने ममता बॅनर्जींना पाठिंबा द्यायला हवा, असे शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेस नेत्याने शरद पवार यांना पत्र लिहून प्रचाराला येऊ नका, असे आवाहन केले आहे.