मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी रहात असलेल्या मुंबईतील हाय प्रोफाइल भागात स्फोटकाने भरलेली गाडी सापडल्यानंतर या गाडी मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. याच प्रकरणात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर राज्य सरकार आणि गृहमंत्रालयावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणामुळे बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे सरकारने डॅमेज कंट्रोल करण्याची तयारी सुरु केली. यासाठी मुंबई पोलीस आयुक्त बदलाच्या हालचाली सुरु झाल्या. अखेर आज ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत मुंबई पोलिस आयुक्त पदावर हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली. राज्य सरकार अडचणीत असताना ज्या अधिकाऱ्यावर मुंबई पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली ते हेमंत नगराळे नक्की आहेत कोण, याची चर्चा सुरु झाली आहे.
1987 बॅचचे IPS अधिकारी
हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण चंद्रपूरमधील भद्रावती जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सहावीपर्यंत झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते नागपुरमध्ये आले. नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. आता त्यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पहिली पोस्टिंग नक्षलग्रस्त भागात
हेमंत नगराळे हे आयपीएस झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात करण्यात आली. नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यात त्यांच्यावर ASP ची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर 1992 ते 1994 या कालावधीत त्यांनी सोलापूर जिल्ह्यात पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून कार्यभार संभाळला. या काळात सोलापूर शहरात झालेल्या दंगली दरम्यान त्यांनी कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवली.
MPSC पेपर लीक घोटाळ्याचा तपास
हेमंत नगराळे हे 1994-1996 या कालावधीत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले. या कालावधीत त्यांनी दाभोल पॉवर कॉर्पोरेशनशी संबंधित जमीन अधिग्रहण प्रकरण योग्य रित्या हाताळले. यानंतर 1996-1998 या कार्यकाळात त्यांची बदली सीआयडी क्राईमचे एसपी पदावर करण्यात आली. त्यावेळी राज्यभर पसरलेल्या MPSC पेपर लीक घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन त्यांनी तपास केला. या पदावर असताना त्यांनी अनेक क्लिष्ट केसेस सोडवून पीडितांना न्याय मिळवून दिला.
अनेक आव्हाने समोर असणार
मुंबईत मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडीमुळे आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळत असताना हेमंत नगराळे यांच्यासमोर अनेक आव्हान असणार आहेत. सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलाला लागलेला डाग पुसून काढत शहरात कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. हे आव्हान पेलताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यामध्ये ते कशा प्रकारे यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.