भोपाळ : बहुजननामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात अनेक वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहिल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सुनविताना पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या तक्रारीबाबत तुमची टॉयलेट, गटारे साफ करण्यासाठी मी खासदार झालेले नाही, असे प्रज्ञासिंह यांनी उत्तर दिले. मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या.
मध्य प्रदेशातील भोपाळ येथून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. निवडणुक काळात प्रज्ञासिंह यांनी मुंबईवरील हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्यावर सर्व बाजूंनी टिका झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण त्यांना कधी माफ करणार नाही, असे म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार सातत्याने करीत असताना प्रज्ञासिंह यांनी एक वक्तव्य केले आहे. सिहोर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तेथील नागरिकांनी सिहोर परिसरातील अस्वच्छेबाबत तक्रारी केल्या होत्या. त्याला उत्तर देताना माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडेन, पण टॉयलेट साफ करणे हे माझे काम नाही, असे उत्तर दिले.
त्या म्हणाल्या आम्ही गटारे साफ करण्यासाठी नाही आहोत. ठीक आहे ना. आम्ही तुमची शौचालय स्वच्छ करण्यासाठी अजिबात निवडून आलो नाही. आम्ही जे काम करण्यासाठी निवडून गेलो आहोत. ते काम आम्ही इमानदारीने करु. असे आम्ही पूर्वीही म्हणत होतो, आजही त्यावर ठाम आहोत आणि उद्याही आमचे म्हणणे तेच असेल, असे त्या म्हणाल्या.
खासदारांचे काम गटारे साफ करण्याचे नसले तरी त्यांनी ज्या पद्धतीने नागरिकांना उत्तर दिले. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला असून प्रज्ञासिंह यांनी जाणीवपूर्वक हे बोलल्या अशी टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे.