दिल्ली (बहुजननामा) – योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाकडून तयार होणारी सरबते अमेरिकेत विकली जातात. अमेरिकेत निर्यात करण्यात आलेल्या या सरबतांच्या बाटल्यांवर अतिरिक्त वैद्यकीय गुणधर्म आणि आहारमूल्य असल्याचे लेबले लावल्याचा दावा अमेरिकेच्या आरोग्य नियंत्रक संस्थेने केला आहे. भारतात मात्र यासाठी वेगळे दावे असलेले लेबल असल्याचे द युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (युएसएफडीआयए)चे म्हणणे आहे. पतंजलीच्या हरिद्वार येथील युनिट तीनची तपासणी ‘यूएसएफडीए’च्या मौरीन वेंटझेल यांनी गेल्या वर्षी ७ आणि ८ मे या दोन दिवशी केली होती. बेल शरबत आणि गुलाब शरबत या उत्पादनांबाबत ही निरीक्षणे वेंटझेल यांनी आपल्या अहवालात नोंदवली आहेत. पंतजली विरोधात केलेल्या दाव्यांमध्ये तथ्य अडळल्यास पंतजली उत्पादनावर अमेरिकेत बंदी घातली जावू शकते.
पंतजली विरोधात अमेरिकेचे अन्न प्रशासन न्यायालयात जावू शकते. तसेच या विषयी पतंजलीला नोटीस देखील पाठवण्याची शक्यता आहे. पंतजली विरोधातील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास त्यांच्या उत्पादनांची आयातही पूर्णत: रोखली जावू शकते तसेच निर्यात झालेली उत्पादनाची पूर्ण बॅचही थांबवली जावू शकते. य़ा गुन्हासाठी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याला तीन वर्षांपर्यंत शिक्षा आणि कंपनीला पाच लाख डॉलरपर्यंत दंडही होऊ शकतो.
योग गुरु रामदेव बाबा यांनी स्वदेशीचा नारा देत पतजंली उद्योग समुहाची स्थापना केली. हा उद्योग समुह आयुर्वेदीक उत्पादने बनवण्यात आघाडीवर आहे. देशातच नव्हे तर परदेशात देखील ते आपल्या उत्पादनाची विक्री करत असतात. त्यामुळे जर अमेरिकेने पतंजलीच्या उत्पादनावर बंदी घातली तर त्याचा परिणाम पंतजलीची उत्पादने आंतराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करण्यावर होणार होईल.