वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – मंदिरात प्रवेश केल्यावरून मारहाण करण्याच्या घटना ताज्या असतानाच आता असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मंदिरात चोरीच्या संशयावरुन एका आठ वर्षीय मुलाला गरम फरशीवर (टाईल्स) बसवल्याने त्याच्या पार्श्वभागाला गंभीर दुखापत झाली आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे ही घटना घडली. ह्या अमानुष कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आर्वीमधल्या जोगनामाता मंदिर परिसरात चिमुकला खेळत होता. त्यावेळी उमेश उर्फ अमोल ढोरेने मुलाचे कपडे काढून मारहाण केली आणि मंदिर परिसरातीलच टाईल्सवर बसवलं. टाईल्स गरम असल्याने काही वेळातच चिमुकल्याच्या पार्श्वभागाला गंभीर दुखापत झाली. अशा प्रकारचे त्या चिमुकल्याचे फोटो माध्यमांवर व्हायरल होत असून याबाबत एकच खळबळ उडाली आहे.
जखमी चिमुकल्याला आई वडिलांनी रुग्णालयात नेलं असून याबाबत अमोल ढोरेला जाब विचारला असता, त्याने मुलावर चोरीचा आळ घेतला. शिवाय शिवीगाळ करत अंगावर धावून आल्याचं आईने सांगितलं. पिडीत चिमुकल्याचे आई – वडिलांनी केलेल्या तक्रारीवरुन आर्वी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी उमेश उर्फ अमोल ढोरेला अटक केली आहे. अमोल ढोरेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून त्याच्यावर यापूर्वी दारुविक्रीचे गुन्हे नोंद असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यासह त्याच्या कुटुंबियांची विविध सामाजिक संघटनांनी भेट घेत मदतीची तयारी दर्शवली आहे. चिमुकल्यावर आर्वीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.